RajniKanth Home: रजनीकांतही शिवभक्त! घरातील शिवरायांचा फोटो चर्चेत; मुलीची पोस्ट Viral
Chhatrapati Shivaji Maharaj: रजनीकांत यांच्या मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने पोंगलच्या (Pongal) सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यापैकी रजनीकांत यांच्या घरात काढलेल्या एका फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Photo At RajniKanth Home: रजनीकांत (RajniKanth) या नावाची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. रजनीकांत यांचं मूळ महाराष्ट्रातील (Maharashtra) असलं तरी त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली आहे. प्रामुख्याने तामिळ चित्रपटांमध्ये सुपरस्टार ही नवी ओळख निर्माण करणारे रजनीकांत कन्नड, तेलगू, हिंदीसहीत इंग्रजी चित्रपटांमध्येही झळकले आहेत. त्यांचा 'शिवाजी: द बॉस' या तामिळ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन देशभरात गाजलं. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सर्वाधिक मानधन घेण्याचा विक्रम केला. बरं हा विक्रम फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता तर ते आशियामधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले. रजनीकांत हे चित्रपटांबरोबर राजकारण आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या मुलीने (RajniKanth Daughter) शेअर केलेल्या एका फोटोमुळे. रजनीकांत यांच्या घरातील या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पोस्ट केले चार फोटो
नुकताच रजनीकांत यांनी त्यांच्या कुटुंबियांबरोबर पोंगल (Pongal) हा सण साजरा केला. यावेळी सर्वच कुटुंबीय एकत्र होते. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने (Aishwarya Rajinikanth) सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. तशी ऐश्वर्या सोशल मीडियावर फार सक्रीय असल्याने ती अनेकदा सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत चाहत्यांना खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स देत असते. असेच तीने पोंगलचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या किचनमध्ये पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती केळीच्या पानावर नैवद्य वाढताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या गोमातेला नैवद्य दाखवताना दिसत आहे.
चौथ्या फोटोने वेधलं लक्ष
ऐश्वर्याने केलेल्या पोस्टमधील चौथा फोटो हा घरातील असून त्यामध्ये ऐश्वर्या आई-वडिलांच्या म्हणजेच रजनीकांत आणि लता यांच्या पाया पडताना दिसत आहे. पालकांचा आशिर्वाद घेतानाचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. कारण या फोटोमध्ये रजनीकांत ज्या भिंतीसमोर उभे आहेत त्या भिंतीवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूर्णाकृती फोटो दिसून येत आहे. एका पिलरवर हा फोटो दिसत असून छत्रपती शिवाजी महाराज गडावरुन उतरतानाचं दृष्य या फोटोत दिसत आहे.
रजनीकांत यांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली असून आजही ते आपलं मूळ विसरलेले नाहीत हे या फोटोवरुन स्पष्ट होत आहे. रजनीकांत यांची मातृभाषा मराठी असून त्यांनी अनेकदा आपल्या महाराष्ट्र कनेक्शनबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. त्यांच्या घरातील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांना महाराजांबद्दल वाटणारा आदर आणि प्रेम दाखवणारच आहे.