बाहुबलीपेक्षा चांगला चित्रपट बनवू शकतोस का? रामगोपाल वर्माच्या प्रश्नावर संदीप रेड्डी वांगाने दिलं उत्तर, म्हणाला...
नुकतंच झालेल्या एका चर्चेत रामगोपाल वर्माने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला तू बाहुबलीपेक्षा चांगला चित्रपट बनवू शकतोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने काय उत्तर दिलं पाहा.
बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आणि संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) एकमेकांची स्तुती करताना थकत नव्हते. नुकतंच एका मुलाखतीच्या निमित्ताने एकत्र आले असता त्यांनी एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव केला. तसंच दोघेही कशाप्रकारे एकमेकांचे चित्रपट आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत याबद्दल सांगत होते. रामगोपाल वर्माने अॅनिमल चित्रपटाबद्दल संदीप रेड्डी वांगाची पाठ थोपटली. यावर त्याने मला तुमच्याकडूनच प्रेरणा मिळाली असल्याचं सांगितलं. संदीप रेड्डी वांगाला यावेली सर्वोत्तम एडिटिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी बाहुबलीपेक्षा उत्तम चित्रपट बनवण्यावरुन हलक्या फुलक्या अंदाजात भाष्य केलं.
रामगोपाल वर्माने यावेळी संदीप रेड्डी वांगाला एक अडचणीत आणणारा प्रश्न विचारला. "मी तुला एक प्रश्न विचारत आहे. तू याचं उत्तर क्षणाचाही विलंब न लावता दिलं पाहिजेस. ठीक आहे? तू बाहुबलीवर आधारित चित्रपट बनवू शकतोस का?". संदीपने यावेळी काही सेकंद घेतले आणि नंतर रामगोपाल वर्माकडे पाहत उत्तर दिलं की, "मी प्रयत्न करेन, सर. कदाचित भविष्यात". रामगोपाल वर्मा या उत्तरानंतर काहीसा आश्चर्यचकित झालेला दिसला. तो म्हणाला, "अरे हे योग्य उत्तर नाही. तू हो किंवा नाही सांगायला हवं".
संदीप रेड्डी वांगा काहीसा अडखळला आणि पुन्हा म्हणाला की, मी प्रयत्न करेन. पण रामगोपाल वर्माने त्याला पुन्हा एकदा खडसावलं. "संदीप हे योग्य उत्तर नाही. तू असं डिप्लोमॅटिक उत्तर देऊ शकत नाहीस". यानंतर संदीपने अखेर उत्तर दिलं आणि म्हमाला, "माझं तात्काळ उत्तर नाही असं आह". यानंतरही रामगोपाल वर्मा थांबला नाही. त्याने विचारलं, "ठीक आहे, हा नाही म्हणत आहे. तर मग माझा पुढील प्रश्न आहे की, तू बाहुबलीपेक्षा उत्तम चित्रपट बनवू शकतोस का?". त्यावर संदीपने पुन्हा एकदा 'मी प्रयत्न करेन,' असं उत्तर दिलं. यानंतर रामगोपाल वर्मा हसला आणि हस्तांदोलन करत म्हणाला, "प्रयत्न नको. मला उत्तर मिळालं आहे. जबरदस्त".
रामगोपाल वर्मान वंगाला त्याचा 1990 चा ॲक्शन चित्रपट शिवा आणि अर्जुन रेड्डी एकाच दिवशी रिलीज झाले तर कोणता चित्रपट चांगली कामगिरी करेल असं विचारलं. त्यावर वांगाने शिवाची निवड केली. तेव्हा वर्माने त्याला पुन्हा पकडलं आणि दावा केला की तो विनम्र आणि मुत्सद्दी बनण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर वांगाने रामगोपाल वर्माला पुन्हा एकदा चांगला चित्रपट बनवण्याची विनंती केली. यानंतर प्रेक्षकांकडूनही रामगोपाल वर्माच्या नावाची घोषणा करण्यात आली.