Ranbir Kapoor Controversy : बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (Tu Jhoothi Main Makkaar) व्यस्त आहे. मात्र त्याआधीच रणबीर कपूर हा त्याच्या गेल्या वर्षी केलेल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. मात्र आता त्याने आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं स्पष्टीकरण देत आपलं म्हणणं मांडलं आहे. कला आणि कलाकारांना देशाची सीमा दिसत नाही, असे म्हणत रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) पाकिस्तानी चित्रपटात (Pakistan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या वर्षी झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (red sea international film festival) रणबीरने हे वक्तव्य केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने याबाबत भाष्य केले आहे. प्रमोशनदरम्यान, रणबीरला तुला खरोखरच पाकिस्तानी चित्रपटात काम करायचे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रणवीरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


काय म्हणाला होता रणबीर कपूर?


गेल्या वर्षी, रणबीर कपूरला रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला होता. यावेळी  त्याला काही पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनी जर चांगली कथा असेल तर तुला पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का? असे विचारले होते. 


यावर रणबीर कपूरने, "का नाही सर! मला वाटते कलाकारांसाठी सीमा नसतात. मला (पाकिस्तानी चित्रपटात) काम करायला आवडेल. द लीजेंड ऑफ मौला जटला मिळालेल्या यशासाठी पाकिस्तानी चित्रपट उद्योगाचे अभिनंदन. या चित्रपटाने उत्तम काम केले आहे आणि गेल्या काही वर्षांतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे," असे म्हटले होते.


रणबीरचे स्पष्टीकरण


"त्या चित्रपट महोत्सवात अनेक पाकिस्तानी चित्रपट निर्माते होते आणि मला कोणतेही वादग्रस्त विधान करायचे नव्हते. मला नाही वाटत की माझ्या वक्तव्यामुळे एवढा मोठा वाद झाला असेल. पण माझ्यासाठी चित्रपट हा फक्त एक चित्रपट आहे. मी फवाद खानसोबत 'ए दिल है मुश्किल'मध्ये काम केले आहे. मी पाकिस्तानातील अनेक कलाकारांना ओळखतो. राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम हे अप्रतिम गायक आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत योगदान दिले आहे. म्हणूनच माझ्या मते सिनेमा हा फक्त सिनेमा असतो आणि त्याला कधीही सीमा नाही," असे स्पष्टीकरण रणबीर कपूरने दिलं आहे.


दरम्यान, रणबीरचा 'तू झुठी मैं मक्कर' हा चित्रपट 8 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूर, कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांसारखे कलाकार दिसणार आहेत. लव रंजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.