मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आनंदाची बातमी दिल्यामुळे भट्ट आणि कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. खुद्द आलियाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. गेल्या काही दिवसांपासून आलिया प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असताना, दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. सध्या रणबीरने एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचं प्रचंड कौतुक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत रणबीरने दीपिकाच्या अभिनयाबद्दल आणि यशाबद्दल कौतुक केलं. 'तमाशा' सिनेमात रणबीर आणि दीपिकाने एकत्र काम केलं. यावेळी रणबीरने 'तमाशा' आणि 'अगर तुम साथ हो' गाण्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं. 


रणबीर म्हणाला, 'सिनेमात दीपिकाने केलेला अभिनय अतुलनिय आहे. दीपिकाने त्या भूमिकेला जिवंत केलं, दीपिकासोबत काम करणं माझ्यासाठी उत्तम अनुभव होता. आम्ही दोघांनी एकत्र करियरला सुरुवात केली.'


'दीपिका आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आम्ही 'बचना ए हसीनो' सिनेमा एकत्र केला. त्यानंतर 'ये जवानी है दिवानी' सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल. मी दीपिकाला फार पूर्वीपासून ओळखतो. दीपिकाच्या प्रत्येक शॉटने आणि प्रत्येक गोष्टीने मला आश्चर्यचकित केले. ' असं देखील रणबीरने सांगितलं. 


रणबीरचे आगामी सिनेमे 
रणबीर लवकरचं 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात रणबीरसोबत पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय अभिनेता 'शमशेरा' सिनेमा देखील प्रतीक्षेत आहे.