आपल्या टीझरने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या भूमिकांनी चित्रपटाची उत्सुकता शिगेला नेली आहे. चित्रपटात खूप हिंसा दाखवण्यात आली असल्याने त्याला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं आहे. हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणार आहे. दरम्यान ट्रेलर रिलीज झाल्यापासून एकीकडे रणबीर आणि बॉबी यांचं कौतुक केलं जात असताना दुसरीकडे रश्मिकाला मात्र ट्रोल व्हावं लागत आहे. याचं कारण रश्मिकाने केलेली डायलॉग डिलिव्हरी ठरत आहे. रश्मिकाचे अस्पष्ट संवाद ऐकून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका निभावत आहे. ट्रेलरमध्ये एके ठिकाणी रश्मिका रणबीरसह संतापात वाद घालताना दाखवलं आहे. यानंतर रणबीर तिचा गळा पकडतो. पण या सीनमध्ये रश्मिका काय बोलते हे समजतच नाही. यामुळे नेटकऱ्यांनी रश्मिकाच्या अस्पष्ट संवादावर टीका केली आहे. ट्रेलरमधील रश्मिकाचा हा सीन एक्सवर अनेकांनी शेअर करत तिला ट्रोल केलं आहे. 


एका युजरने लिहिलं आहे की "दिग्दर्शकाने या सीनला हिरवा कंदील कसा काय दिला याचं आश्चर्य वाटतं? फायनल कटमध्येही हा सीन कसा काय ठेवला?".



दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, "समजलं नाही, आणि ऐकून चांगलंही वाटलं नाही".



दरम्यान एकाने मी किती वेळा ट्रेलर पाहिला पण अद्यापही रश्मिका नेमकं काय म्हणत आहे हे समजलं नाही असं म्हटलं आहे. 



दरम्यान ट्रेलरवरुन हा चित्रपट मुलगा आणि बापाच्या नात्यावर भाष्य करत असल्याचं दिसत आहे. वडिलांना आपला अभिमान वाटावा यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकणारा मुलगा यात दाखवण्यात आला आहे. अनिल कपूरने बापाची तर रणबीर कपूरने मुलाची भूमिका निभावली आहे. रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल प्रमुख व्हिलन आहे, ज्याच्या मागावर रणबीर कपूर आहे. 


संदीप रेड्डीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'कबीर सिंग'नंतर हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'ला चित्रपट आव्हान देईल. याआधी चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. पण 'गदर', 'ओएमजी 2' आणि 'जेलर'मुळे तारीख पुढे ढकलण्यात आली होती.