ज्याची भीती होती तेच झालं... अण्णा नाईकांचा भास होतोय
`रात्रीस खेळ चाले ३` मालिकेची अशीही चर्चा
मुंबई : ‘अण्णा नाईक’ परत येणार, याची चर्चा सर्वत्र झाली. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे. 'रात्रीस खेळ चाले २'मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये काय असणार याचीच उत्सुकता सर्वांनाच आहे.
म्हणूनच रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक नवीन युक्ती वापरली गेली, एक असं होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल. जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात. प्रमोशनच्या अनोख्या प्रकारासाठी याचा उल्लेख नक्कीच केला जाईल.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील माई, अण्णा, सुषमा, दत्ता, छाया, वच्छी, पांडू, शेवंता, अभिराम अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपल्या भूमिका साकारल्या होती, त्यामुळे आजही ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने तर प्रत्येकाच्याच मनात भिती निर्माण केली, तर अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंता या पात्राने भुरळ घातली होती. आता या दोन्ही पर्वातील पात्रे तिस-या पर्वामध्ये कशी आणि कोणत्या रूपात भेटीला येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिले पर्व हा स्कीक्वेल होता, दुसरे पर्व हे प्रीक्वेल होते तर आताचे हे तिसरे पर्व नेमके कसे असेल याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. दोन्ही पर्वाचे दिग्दर्शन राजू सावंत आणि लेखन प्रल्हाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांनी केले होते. तिस-या पर्वासाठी देखील दिग्दर्शक, लेखक यांच्यासह सर्व कलाकारांची तीच टीम कायम आहे.