`मुळशी पॅटर्न`चा रिमेक, `हा` अभिनेता साकारणार भूमिका
गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा `मुळशी पॅटर्न` चित्रपट आता हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : मुळशी तालुक्यातील गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा 'मुळशी पॅटर्न' चित्रपट आता हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुषने 'लव्हयात्री' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. पण त्याच्या पहिल्या चित्रपटाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी त्याच्यामध्ये फार रस दाखवला नाही.
अभिनेता सलमान खानने आयुषला बॉलिवूडमध्ये संधी दिली. आयुष प्रमाणे तो अनेक कलाकारांचा गॉडफादर आहे. पण आयुषचा पहिला चित्रपट रूपरी पडद्यावर आपली जादू दाखवण्यात अशस्वी ठरला. म्हणून सलमान पुन्हा आपल्या लाडक्या बहिणीच्या पतीसाठी कामाला लागाला आहे.
आयुषसाठी सलमानने नवीन चित्रपट साकारण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक असणार आहे. चित्रपटामध्ये सलमान सहायक अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात सलमान भूमिका साकारणार असला तरी चित्रपटाची संपूर्ण कथा आयुष भोवती फिरताना दिसणार आहे.
त्यामुळे आगामी चित्रपटासाठी आयुष मराठी भाषेचे धडे गिरवत आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेला 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतला होता. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सलमान आणि अरबाज खानसाठी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवले होते.
हा चित्रपट त्यांना चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळे त्यांनी 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.