चाहत्याचा जीव घेणाऱ्या अभिनेत्याच्या फार्महाऊसवर सापडला आणखी एक मृतदेह; चिठ्ठीने वाढलं गूढ
Kannada Actor Darshan Farmhouse: या आत्महत्येमुळे प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता इतर काही संदर्भ सापडतात का याचा शोध सुरु केला आहे.
Kannada Actor Darshan Farmhouse: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला हादरवून टाकणाऱ्या रेणुका स्वामी हत्या प्रकरणामध्ये (Renuka Swami Murder Case) आणखीन एक मोठी अपडेट समोर आली असून या घटनेमुळे सदर हत्येचं गूढ अधिक वाढलं आहे. कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला (Darshan Thoogudeepa) अटक केल्यामुळे चर्चेत असलेलं हे प्रकरण समोर आल्यानंतर दर्शनच्या फार्महाऊसची देखभाल करणाऱ्या मॅनेजरने आत्महत्या केली आहे. दर्शनच्या फार्महाऊसवरच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि व्हिडीओ मेसेज समोर आला असून या आत्महत्येमुळे रेणुका स्वामी प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. या कर्मचाऱ्याचा मृतदेह दर्शनच्या फार्महाऊस जवळ सापडला आहे.
आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओही समोर आला
दर्शनच्या फार्महाऊसची देखभाल करणाऱ्या श्रीधर नावाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये, एकटेपणाला कंटाळून आपण हा टोकाचा निर्णय घेत आहोत, असं म्हटलं आहे. श्रीधरने आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेला व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये त्याने एकटेपणामुळेच आपण स्वत:ला संपवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये माझ्या आत्महत्याप्रकरणामध्ये माझ्या नातेवाईकांना तपास यंत्रणांनी त्रास देऊ नये अशी इच्छाही व्यक्त केली आहे. माझ्या मृत्यूला मी स्वत: जबाबदार आहे असं म्हटलं आहे.
रेणुका स्वामी हत्या प्रकरणाशी कनेक्शन?
श्रीधरच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. श्रीधरच्या आत्महत्येचा रेणुका स्वामी हत्या प्रकरणाशी काही संबंध तर नाही ना? याचा तपास पोलीस करत आहेत. श्रीधरने रेणुका स्वामी हत्या प्रकरणामध्ये मालक दर्शनला कोणत्याही प्रकार काही मदत केली होती का? रेणुका स्वामी हत्या प्रकरणाचं या फार्म हाऊसशी काही कनेक्शन आहे का याचा शोध घेत आहे.
आधीचा मॅनेजर सहा वर्षांपासून गायब
रेणुका स्वामी प्रकरणाच्या तपासादरम्यान दर्शनचा आधीचा मॅनेजर मल्लिकार्जून 2018 पासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीधरने आत्महत्या केल्याने गूढ अधिक वाढलं आहे. मल्लिकार्जूनने दर्शनच्या घरातून 2 कोटी रुपयांची चोरी केली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाला तो कायमचाच. आता त्याचाही शोध घेतला जात आहे.
चाहत्यांकडून घडवली चाहत्याची हत्या
दर्शनला 12 जून रोजी अटक करण्यात आली आहे दर्शनने पवित्रा गौडावर (Pavithra Gowda) करण्यात आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे रेणुका स्वामी नावाच्या चाहत्याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दर्शनने रेणुका स्वामीच्या हत्येसाठी आपल्याच काही चाहत्यांना भरपूर पैसे पुरवल्याचा दावा केला जात आहे. या चाहत्यांनी रेणुका स्वामीचं अपहरण केलं. रेणुका स्वामीला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह बंगळुरुमधील नाल्यामध्ये टाकला होता.