मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर मुलगी रिद्धिमा कपूर असा परिवार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मध्यंतरी त्यांनी परदेशात जाऊन उपचार करून घेतले होते. यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते. काही दिवसांपूर्वी श्वसनाच्या त्रासामुळे ऋषी कपूर यांना मुंबईच्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  



ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीत आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते. आपले वडील राज कपूर यांच्या अभिनयाचा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पुढे नेला. अवघ्या तीन वर्षांचे असताना ऋषी कपूर यांनी 'श्री ४२०' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले. तर राजकपूर दिग्दर्शित 'मेरा नाम जोकर'मधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. यानंतर 'बॉबी' या चित्रपटाने ऋषी कपूर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.


मोठ्या पडद्यावर १९७० ते १९९० हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'कर्ज' या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.