मी जीवंत नसेन पण...; हॅग्रिड फेम Robbie Coltrane चा तो व्हीडियो व्हायरल
रॉबी यांच्या निधनानंतर त्यांचा एक डायलॉग सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
मुंबई : हॅरी पॉटर फ्रँचायझीमध्ये हॅग्रीडची भूमिका करणारा हॉलिवूड अभिनेता रॉबी कोलट्रेन यांचं काल निधन झालंय. रॉबी 72 वर्षांचे होते आणि त्यांची एजंट बेलिंडा राईट याबाबत माहिती दिली. दरम्यान रॉबी यांच्या निधनानंतर त्यांचा एक डायलॉग सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
रॉबी यांच्या निधनाची बातमी समजताच हॅरी पॉटरच्या आणि रॉबीच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण लाडक्या हॅग्रीडला मिस करताना दिसतोय. चाहत्यांसाठी हे एका युगाच्या समाप्तीप्रमाणे आहे. #RobbieColtrane ट्विटरवर ट्रेंड करत असू चाहते त्यांच्या आठवणीत शोकाकूल झालेत.
दरम्यान हॅरी पॉटर 20th Anniversary: Return to Hogwarts या हॅरी पॉटर फ्रँचायझीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त एक खास शो घेण्यात आला होता. या शोमध्ये रॉबी कोलट्रेन अखेर दिसला होता. 2022 मध्ये नवीन वर्षाच्या दिवशी Amazon Prime वर हा शो रिलीज केला होता.
या शोच्या एका दृश्यात रॉबीने सांगितलं की, पुढील 40 वर्षांमध्ये मी या जगात नसेन, परंतु त्याचे पात्र हॅग्रीड जीवंत राहिल. रॉबी यांचा हा डायलॉग आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्कॉटलंडमधील लार्बर्ट इथल्या त्यांच्या घराजवळील रुग्णालयात त्यांचं निधन झालं. रॉबी कोलट्रेनची प्रकृती दोन-तीन दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे रॉबी कोलट्रेनवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
रॉबी कोलट्रेन यांच्या निधनामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीचे मोठं नुकसान झालं आहे. 'हॅरी पॉटर' या चित्रपटात रॉबी कोलट्रेनच्या माध्यमातून साकारलेली हॅग्रीडची व्यक्तिरेखा खूप चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि सर्वांना खूप आवडली होती.