मुंबई : मेघना गुलजार यांच्या चित्रपटातून वेब सीरिज विश्वातील एक अतिशय लोकप्रिय चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिका, वेब सीरिज आणि आता थेट बॉलिवूड चित्रपट असा या अभिनेत्याच्या करिअरचा चढता आलेख आहे. लोकप्रियता आणि यशाच्या वाटेवर चालणारा हा अभिनेता आहे, विक्रांत मेसी. सध्या तो 'छपाक' या आगामी चित्रपटाच्यानिमित्ताने काही कामात व्यग्र असतानाच दिल्लीत त्याला विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिड डे'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या साकेत परिसरात 'छपाक'चं चित्रीकरण सुरु असतानाच त्याने एका अनपेक्षित प्रसंगाचा सामना केला. विक्रांतची एकंदर लोकप्रियता पाहता चित्रपटाच्या टीमकडून सुरक्षेच्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पण, तरीही नववधूच्या वेशातील एक तरुणी सेटवर आली. तिने सर्वांचं लक्ष वेधलं. अचानकपणे चित्रपटाच्या सेटवर आलेल्या त्या तरुणीने ऱडण्यास सुरुवात केली. विक्रांतला भेटण्याचीच मागणी तिने वारंवार केली. 


इतकच नव्हे तर, लग्न करायचं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. जवळपास तासभर ही रडारड केल्यानंतर अखेर विक्रांतने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिला लग्नमंडपात परतण्याचा सल्ला दिला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर सुरक्षा रक्षक, आणि पोलिसांना चित्रपटाच्या सेटवर बोलवण्याचाच पर्याय निवडावा लागला. 



आपल्यासोबतच्या या प्रसंगावर नेमकं व्यक्त कसं व्हावं हेच विक्रांतच्या लक्षात येत नव्हतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. दरम्यान, संबंधित तरुणीला साकेत पोलिसांनी तिच्या घरी सुखरूप पोहोचवल्यानंतर काही तासांसाठी चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. हा प्रसंग पाहता एखाद्या कलाकाराप्रती असणारी ओढ, वेड, प्रेम या सर्व गोष्टी मान्य आहेत, पण याच जबरा फॅन्समुळे कलाकारांनाही अडचणीच्या प्रसंगांचा सामना करावा लागतो हे खरं.