Mithun Chakraborty Birthday: बॉलिवूडमधील सुपरस्टार्सची नावं जेव्हा घेतली जातात तेव्हा त्यात मिथुन चक्रवर्तीचंही नाव घेतलं जातं. 80-90 च्या दशकात मिथुन चक्रवर्ती अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टार्सना स्पर्धा देत होता. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डिस्को डान्सर' चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्ती रातोरात सुपरस्टार झाला. या चित्रपटाने त्याला डान्स आयकॉन म्हणून ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे मिथुन चक्रवर्ती फक्त भारतच नाही तर संपूर्ण आशिया खंड, तुर्की आणि रशियातही एक लोकप्रिय अभिनेता झाला. 'डिस्को डान्सर' चित्रपटाली 'जिमी जिमी जिमी आजा आजा आजा' गाण्याने तर भारतच नाही तर परदेशातही धुमाकूळ घातला होता. महत्वाचं म्हणजे, भारतात प्रदर्शित झाल्यानंतर 2 वर्षांनी हा चित्रपट विदेशात रिलीज झाला होता. हा चित्रपट विदेशात इतका चालला की 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. 16 डिसेंबरला मिथुन चक्रवर्तीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्या प्रसिद्धीने कोणतं टोक गाठलं होतं याचा एक किस्सा जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन चक्रवर्ती भारतातही नसावा तितका जास्त रशियात प्रसिद्ध असून सुपरस्टार आहे. रशियात मिथुन चक्रवर्तीला ओळखत नाही असा व्यक्ती कदाचितच सापडेल. तुम्ही युट्यूबवर जाऊन पाहिलं तर मिथुन चक्रवर्तीचे रशियातील अनेक असे व्हिडीओ आहेत जे पाहिल्यावर तुम्हाला त्याच्या प्रसिद्धीची जाणीव होईल. दक्षिण आशिया आणि रशियात मिथुन चक्रवर्तीचा मोठा चाहतावर्ग आहे. 


रशियात जेव्हा 'डिस्को डान्सर' चित्रपट रिलीज झाला तेव्हा मिथुन चक्रवर्ती नावाचं जणू वादळच आलं होतं. त्यावेळी मिथुन चक्रवर्तीचं वेड इतकं होतं की नेत्यांना त्यांच्या रॅली रद्द कराव्या लागल्या होत्या. झालं असं होतं की, रशियात राजकीय रॅली निघणार होती. पण त्याच दिवशी मिथुन चक्रवर्ती रशियात दाखल होणार होता. मिथुन चक्रवर्ती येणार असल्याने त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते विमातनळावर पोहोचले होते. ही संख्या इतकी मोठी होती की राजकीय सभांना लोकच नव्हते. अखेर नाईलाजास्तव नेत्यांवर राजकीय सभा रद्द करण्याची वेळ आली होती. 


'डिस्को डान्सर' चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार


'मृगया' या पहिल्या चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्याने बरेच चित्रपट केले पण लोक कौतुक करतील असं यश मिळत नव्हतं. एके दिवशी मिथुन 'तकदीर का बादशाह' चित्रपटाच्या शूटिंग सेटवर चिंतेत बसला होता. दिग्दर्शक बी. सुभाष यांनी त्याला अस्वस्थ पाहून कारण विचारले. मिथुनने सांगितलं की, मला चित्रपट मिळत आहेत, मी ते करत आहे पण माझ्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरू शकेल असा एकही चित्रपट मला सापडला नाही. त्यानंतर बी. सुभाष म्हणाले, मी तुझ्यासाठी काहीतरी विचार करतोय जे तुझ्या करिअरला नवे वळण घेईल. त्यांनी मिथुनसोबत डिस्को डान्सर बनवला आणि या चित्रपटाने त्याला एका वेगळ्याचं उंचीवर नेलं. मिथुन रातोरात स्टार झाला. बी. सुभाष निर्मित हा पहिलाच चित्रपट होता. नंतर त्यांनी मिथुनसोबत 'कसम पैदा करने वाले की', 'आंधी तुफान' आणि 'डिस्को डान्सर'चा सीक्वेल 'डान्स डान्स'ही बनवला. बी.सुभाष यांना डिस्को डान्सरचा तिसरा भागही बनवायचा होता. पण हा चित्रपट होऊ शकला नाही.