मराठी अभिनेत्रीच्या वडिलांना कोरोनाची लागण, तिला देखील जाणवली सौम्य लक्षणं
कोरोनाचा वाढता कहर...
मुंबई : फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या विषाणूची लागण फक्त सामान्यांना होत नसून कित्येक सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीय या धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय ऋतुजाला करोनाची सौम्य लक्षणे जाणवली.
त्यामुळे तिला घरातचं क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याबाब महिती ऋतुजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दोन आठवडे खूप तणावपूर्ण गेले. कारण बाबांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मलासुद्धा सौम्य लक्षणे होती. बाबा रुग्णालयात आणि मी, आई, बहिण घरी क्वारंटाइन असल्याचं तिने सांगितलं.
त्याचप्रमाणे वडील आता घरी आल्याची माहिती देत तिने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय करण्याचे चाहत्यांना सांगितले आहे. 'खूप सतर्क रहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्य ते सगळे उपाय करा.' अशी पोस्ट करत तिने काळजी घेण्याचे आवाहन केलं.
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे.