`सेक्रेड गेम्स`च्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रेक्षकांच्या पसंतीला आणखी एक मोहर
मुंबई : देशभरात लोकप्रिय ठरलेली वेब सिरीज 'सेक्रेड गेम्स' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पहिल्या सिझननंतर चाहत्यांनी या वेब सिरीजची खूप आतुरतेने वाट पाहली. त्यानंतर १५ ऑगस्टला सिझन दोन रिलीज करण्यात आला.
सिझन दोन रिलीजनंतर प्रेक्षकांनी या वेब सिरीजला उचलून धरलं. आता या सिरीजच्या शिरपेचात एक मानाचा तुरा लागला आहे. नुकताच पार पडलेल्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड २०१९ मध्ये 'सेक्रेड गेम्स'ला नामांकन जाहिर करण्यात आलं आहे.
ही माहिती रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ शिबाशीष सरकार यानी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. 'सेक्रेड गेम्स'ला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड २०१९ चे बेस्ट वेब सिरीजचे नामांकन मिळाले असून संपूर्ण टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच अभिनेत्री राधिका आपटेला देखील इंटरनॅशनल एमी अवॉर्ड २०१९ मध्ये 'लस्ट स्टोरीज'करता सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं आहे.
'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक आतुरतेने सिझन दोनची वाट पाहत होते. बराचकाळ गेल्यानंतर सिझन दोन प्रेक्षकांच्या भेटीला आला खरा पण त्याने मने जिंकली नाही. पहिला सिझन हा ६ जुलै २०१८ रोजी रिलीज झाला होता.
'सेक्रेड गेम्स' पहिल्या सिझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रम मोटवानीने केलं होतं. तर सिझन दोनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवानने केलं होतं. पहिल्या सिझनमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्धकी, राधिका आपटे आणि कुब्रा सैत मुख्य भूमिकेत होत्या. तर सिझन दोनमध्ये रणवीर शौरी, कल्कि कोचलिन, सुरवीन चावला आणि जतीन सरनाची एन्ट्री झाली आहे. ही वेब सिरीज विक्रम चंद्रा यांच्या २००६ मधील उपन्यास सेक्रेड गेम्स या पुस्तकावर आधारित आहे.