मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड, ग्लॅमरस आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांसमोर येत असते. आता पुन्हा एकदा सई एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सई तिच्या आगामी 'पाँडीचेरी' चित्रपटात झळकणार असून वैभव तत्ववादी तिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. पाँडीचेरीमध्येच १ फेब्रुवारीपासून चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरमध्ये सई आणि वैभव तत्ववादी ब्लॅक अॅन्ड व्हाइट लूकमध्ये दिसत आहेत. पोस्टरवर सईचा 'नो मेकअप नो हेअरस्टाईल' असा लूक दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण पाँडीचेरीमध्येच चित्रित केलं जाणार आहे. हा पहिला असा चित्रपट आहे जो आयफोनवर चित्रित केला आहे. या चित्रपटाशी मी जोडली गेल्याचा मला आनंद होतोय. चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस मी खूप एन्जॉय करतेय. प्रत्येक अभिनेत्रीच्या जीवनात अशा प्रकारचा चित्रपट यायला हवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अतिशय मस्त असल्याचं' सईने सांगितलंय. सईचा हा वेगळा लूक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवणार आहे. त्यामुळे 'पाँडीचेरी' काय कमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



 



सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'पाँडीचेरी'मध्ये सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी व्यतिरिक्त अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर असणार आहेत. सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याआधी २०१६ साली आलेल्या 'वजनदार'मध्ये या दोघांनी एकत्र काम केलं असून सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर आता ही जोडी तीन वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार आहे.