`सैराट`नंतर मी सलग 19 चित्रपट नाकारले आणि आता... ; `आर्ची`च्या वडिलांचा खुलासा, म्हणाले `हा शाप...`
नागराज मंजुळे दिग्दर्शित `सैराट` हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका प्रचंड गाजली. आता याच अभिनेत्याने एक मोठा खुलासा केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातून समाजाचं धगधगतं वास्तव दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा हे सध्या चर्चेत आहेत. ते लवकरच 'खुर्ची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सुरेश विश्वकर्मा यांनी नुकतंच 'राजश्री मराठी' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'खुर्ची' चित्रपटातील त्यांची भूमिका, खलनायकाचे पात्र आणि 'सैराट' चित्रपट याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांना 'सैराट' चित्रपटानंतर तुम्हाला खलनायक पात्र साकारण्याचा कंटाळा आला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. "सैराट चित्रपटानंतर मी सलग 19 चित्रपट नाकारले होते. कारण त्यात सतत राजकारणी आणि मुलीचा बाप असंच पात्र होतं", असे ते म्हणाले.
"मी खूप कंटाळलो होतो"
"सैराट झाल्यानंतर मी अनेक भूमिका त्या पद्धतीच्या साकारल्या. पण त्यानंतर मला सतत त्याच भूमिकांसाठी विचारण्यात आले. त्यामुळे मी खूप कंटाळलो होतो. मी हे का करतोय, असं सतत मला वाटत होतं. यानंतर मी काही वरिष्ठ कलाकारांशी याबद्दल बोललो. त्यावेळी त्यांनी मला एक मोलाचा सल्ला दिला. तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वर्ष लागली, ते तू मोज. जर तू ते पात्र साकारलं नाहीस, तर इतर कोणीतरी हे पात्र साकारणारच आहे. सुरेश विश्वकर्मा तुम्ही ही भूमिका करत नाहीत, तर तुम्हाला दुसरी भूमिका देतो, असं कोणीही म्हणणार नाही", असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.
"...आणि मग माझा संताप कमी झाला"
"आपल्या सिनेसृष्टीला हा शापच आहे की, तुमच्यावर एखाद्या भूमिकेचा ठपका लागला की तुम्हाला त्याच प्रकारच्या भूमिकांची ऑफर दिली जाते. पण तरीही मी काही दिग्दर्शकांना यात थोडा बदल करा असे सांगितले. मी नाकारलेल्या चित्रपटातील काही चित्रपट केले. मी प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करु लागलो आणि त्यानंतर मग माझा होणार संताप कमी झाला", असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान 'खुर्ची' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 12 जानेवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, आर्यन, राकेश बापट,अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे.