मुंबई : #MeToo च्या आरोपानंतर साजिद खानला हाऊस फुल ४ चित्रपटातून हटवल्याची चर्चा आहे. हाऊसफुल्ल ४ चा दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं आहे. याबाबत पत्रकार परिषद होण्याची देखील शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ट्विकंल खन्नानेही हाऊसफुल ४ चित्रपटात सहभागी असलेल्यांनी याबाबत ठोस भूमिका घेण्याचं आवाहन केले आहे.  ट्विकंल खन्नाने याबाबत ट्विट करत भूमिका मांडली आहे. ट्विकंलचा नवरा अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान नाना पाटेकर हे देखील हाऊस फुल्ल ४ मध्ये काम करत असून त्यांना देखील सिनेमातून हटवलं जातं का हे पाहावं लागणार आहे.


बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर Metoo चळवळीची सुरुवात झाली. यानंतर अनेकांची नावं पुढे येऊ लागली. अनेक मोठ्य़ा चेहऱ्यांवर आरोप होत आहेत. यानंतर संपूर्ण बॉलिवुड दोन भागात विभागला गेला आहे. सलमान खान, आमीर खान आणि अमिताभ बच्चन सारखे कलाकार यावर अजून कोणतंही वक्तव्य करत नाही आहेत. दुसरीकडे ट्विंकल खन्ना, सोनम कपूर, प्रियंका चोपडा, परिणीती चोपडा, स्वरा भास्कर आणि ऋचा चड्ढा सारख्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या पाठिशी उभे राहताना दिसत आहेत.


नाना पाटेकर सध्या हाउसफुल 4 सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच नाना पाटेकर सिनेमाच्या सेटवरुन मुंबईत आले आहेत. साजिद खानवर आता आरोप झाल्याने सिनेमाचं काय होणार ? इतर कलाकारा काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.