सलमान खानला मोठा झटका, NGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट
बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
सलमान खानची सामाजिक संस्था (एनजीओ) बीईंग ह्युमन अनेक सामाजिक कामांत सहकार्य करते. मात्र, हीच सामाजिक संस्था आता अडचणतीत येण्याची शक्यता आहे.
घोषणा केली मात्र...
झालं असं की, सामाजिक संस्था बीईंग ह्युमनने २०१६ साली बीएमसीसोबत मिळून डायलिसिस सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र, या संस्थेकडून अद्याप डायलिसिस केंद्र उभारण्यास सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेने याविरोधात कारवाई केली आहे.
बीईंग ह्युमन काळ्या यादीत
डायलिसिस सेंटरच्या कामास जवळपास दोन वर्षांनंतरही सुरुवात न झाल्याने बीएमसीने या संस्थेला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकलं आहे. बीएमसीचे अतिरिक्त मनपा आयुक्त ईडेज कुंदन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
डायलिसिस सेंटरमध्ये लावायच्या होत्या मशीन्स
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, २०१६ साली बीएमसीने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत १२ डायलिसिस सेंटर सुरु करण्याची योजना आखली होती. या दरम्यान बीएमसीने जवळपास ३५० रुपये उपचाराची फी ठेवली होती.
सलमानच्या एनजीओने ३३९.५० रुपयांत डायलिसिस सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये वांद्रे येथे २४ डायलिसिस मशिन्स लावण्याचं म्हटलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सलमान खानच्या एनजीओला बँक गॅरंटीसोबतच इतरही परवानग्या दिल्या होत्या. मात्र, परवानगी दिल्यानंतरही कामाला सुरवात झाली नाही. त्यानंतर बीएमसीने या एनजीओला ब्लॅक लिस्ट करण्याचा यापूर्वीच इशारा दिला होता.
तर बीईंग ह्युमन तर्फे सांगण्यात येत आहे की, काही महत्वाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी सिविक बॉडीला अपयश आलं. त्यामुळे मनपातर्फे या सर्व गोष्टींची लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं बीईंग ह्युमनला वाटतं.