ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या 'तान्हाजी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडनं या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. त्यावरून नव्या वादाला सुरूवात झालीय. अजय देवगनच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं अशी गर्जना करणारे... आणि कोंढाणा किल्ल्याच्या लढाईत आपल्या पराक्रमानं मोघल सरदार उदयभानाचा थरकाप उडवणारे तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची ही गाथा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पण ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमातल्या काही दृश्यांवर संभाजी ब्रिगेडनं तीव्र आक्षेप नोंदवलेत. केवळ दोन्ही संभाजी ब्रिगेडच नव्हे, तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही चित्रपटातल्या काही प्रसंगांवर गंभीर आक्षेप घेतलेत. 


ट्रेलरमध्ये एक साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेनं हातातली कुबडी फेकून मारत असताना सीन आहे. तो इतिहासाला धरुन नाही. शिवाजी महाराजांचा ध्वज भगवा होता. पण त्यावर कोणतंही चिन्ह नव्हतं.


मात्र चित्रपटातल्या भगव्या झेंड्यावर ओम चिन्ह आहे. ते इतिहासाला धरुन नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. तान्हाजींच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री काजोलच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्यातून चुकीचा इतिहास बिंबवण्याचा प्रयत्न होतोय. महाराजांचं राज्य अठरापगड जातीचं होतं. ते कोणत्याही एका विशिष्ट जातीचं नव्हतं.


या वादाला आता राजकीय वळणही लागलंय. चित्रपटातील अनैतिहासिक आणि चुकीच्या घुसडलेल्या गोष्टी काढून टाका, अशी धमकीवजा मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.


चित्रपटाच्या ट्रेलरमधील या दृश्यांबाबत सिनेमाचे निर्माते अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत काय भूमिका घेतात, याकडं आता सगळ्याचं लक्ष लागलंय. यापूर्वी अशाच वादातून राज्यात सामाजिक सलोखा बिघडल्याच्या घटना घडल्यात. तेव्हा केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून याकडं कानाडोळा करून भागणार नाही.