Sameer Wankhede Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचे तिसरे पर्व चांगलेच गाजतेय. या आत्तापर्यंत कार्यक्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि सिनेसृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते. खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात दिग्गज व्यक्तींनी केलेली वक्तवे व त्यांची मुलाखत चांगलीच गाजली होती. आता या कार्यक्रमाच्या पुढील भागात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे सहभागी होणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायक आणि दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांचे सूत्र संचालन असलेला या कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर यासारखे अनेक कलाकार व दिग्गज राजकारणी सहभागी झाले होते. मात्र, आत्ता समीर वानखेडे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येत्या 6 ऑगस्ट रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे. 


प्रोमोमध्ये अवधुत गुप्ते समीर वानखेडे यांना एक प्रश्न विचारताना दिसत आहेत. दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येत आहेत, असं लोक म्हणतात, असा प्रश्न अवधुत यांनी केला आहे. त्यावर समीर वानखेडे यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. मी अशा धमक्यांना घाबरत नाही, असं बेधडक उत्तर त्यांनी दिले आहे. 


आमच्यासाठी हे गुन्हेगार खूप लहान आहेत आणि त्यांचे नाव घेऊन मी त्यांना अजिबात फेमस करणार नाही. मी धमक्यांना अजिबात घाबरत नाहीआणि मी त्यांना आव्हान देतो. तिथे परदेशात बसून धमक्या वगैरे देऊ नकोस हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या दे, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. सध्या समीर वानखेडेंचा हा व्हिडिओ चर्चेत आहे. 


दरम्यान, खुपते तिथे गुप्तेमध्ये समीर वानखेडे कोणते गौप्यस्फोट करणार तसंच, अवधुत कोणते प्रश्न विचारणार, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 



भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळं समीर वानखेडे अडचणीत आले होते. तसंच, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहित माझ्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी पत्रात लिहलं होतं. माझे काही बरेवाइट केले जाऊ शकते, असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अंडरवर्ल्ड दाऊदच्या नावाने आम्हाला धमक्या मिळत आहेत, असं समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने म्हटलं होतं.