संजय दत्तचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
मुबंई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता संजय दत्त आता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. संजय आणि मान्यता 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 'बाबा' चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'संजय.एस.दत्त प्रॉडक्शन्स' अंतर्गत 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'सोबत त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. 'बाबा' चित्रपटातून दीपक दोब्रियाल प्रमुख भूमिका साकारणार असून त्याने या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. नंदिता धुरी पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, आर्यन मेंघजी हेदेखील चित्रपटातून भूमिका साकारणार आहे.
राज आर गुप्ता दिग्दर्शित 'बाबा' चित्रपटात 'भावनांना भाषा नसते' या आशयाने एका कुटुंबाची कथा साकारण्यात आली आहे. 'बाबा' येत्या २ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.