अभिनेता संजय दत्त Lung Cancer उपचारासाठी जाणार अमेरिकेला
अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने (Lung Cancer) ग्रस्त आहे.
मुंबई : अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने (Lung Cancer) ग्रस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला झालेला फुफ्फुसाचा कर्करोग हा तिसऱ्या टप्प्यातील (Stage-3) आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त आज अमेरिकेत उपचारासाठी जाणार आहे. अलिकडेच त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा चाचणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला होता. दोन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर सोमवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.
संजय दत्तने मंगळवारी एक पोस्ट शेअर केली होती. 'माझ्या मित्रांनो, वैद्यकीय उपचारासाठी मी काही दिवसांपासून माझ्या कामावरुन ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि माझे मित्र माझ्याबरोबर आहेत. मी माझ्या हितचिंतकांना विनंती करतो की तुम्ही अजिबात काळजी करु नये आणि अनावश्यक निष्कर्ष काढू नका. आपल्या प्रेम आणि शुभेच्छा, मी लवकरच परत येईन.
फिल्म ट्रेड अनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करत ही महिती दिली. काही दिवसापूर्वी संजय दत्ताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाहटा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. त्याची प्रकृती वेगाने सुधरावी यासाठी आपण प्रार्थना करुयात.
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. आवश्यक उपचारानंतर संजय दत्तला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.