माझे गुण माझ्या मुलांनी घेऊ नयेत-संजय दत्त
`इंडिया टुडे`ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुलांनी आपले गुण घेऊ नयेत, असं मत अभिनेता संजय दत्तने व्यक्त केलं आहे.
मुंबई : 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुलांनी आपले गुण घेऊ नयेत, असं मत अभिनेता संजय दत्तने व्यक्त केलं आहे.
'मी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकवतोय. मोठ्यांचा, आपल्या मदतनीसांचा आदर करणं, आपले संस्कार काय आहेत हे समजून घेणं या सर्व गोष्टींची मी त्यांना शिकवण देतोय. मी फक्त एवढीच प्रार्थना करु इच्छितो की, मुलाने माझ्याप्रमाणे होऊ नये.
कारण, माझ्यामुळे माझ्या वडिलांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या आहेत, त्याच यातना सोसण्याची माझी इच्छा नाही', असं संजय दत्तने म्हटलं आहे.
संजय दत्त दिवंगत अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा आहे. आई- वडिलांचा कलेचा वारसा त्याने पुढे चालवला. संजय दत्तच्या आजवरच्या प्रवासात बरेच चढ- उतार आले. अमली पदार्थाचे व्यसन आणि गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींशी संबंधांमुळे तो अडचणीत आला
संजय दत्तला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. ही शिक्षा भोगून आल्यानंतर आता संजूबाबा सर्वसामान्य आयुष्य जगत आहे. पण, असं असतानाही त्याच्या मनात एका गोष्टीची सल मात्र कायम आहे. तीन मुलांच्या वडिलांच्या भूमिकेत असलेला हा अभिनेता त्याच्या मुलांसाठी मात्र स्वप्न पाहतोय.