मराठी अभिनेते शरद पोंक्षेंची प्रमुख भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ चांगलंच गाजलं. या नाटकाने 26 जानेवारी 2023 रोजी कायमस्वरुपी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नथुराम गोडसे या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पार पडला. या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने यात संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. यावेळी संकर्षणने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या धाडसाचे कौतुकही केले. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 
हेही वाचा : 'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार...', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची...'


संकर्षण कऱ्हाडेने मानले आभार


"नमस्कार माझं नाव संकर्षण कऱ्हाडे, मी हा व्हिडीओ नथुराम गोडसे या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी आणि शरद पोंक्षे सर यांच्यासाठी करत आहे. तुम्ही आज हे नाटक ही कलाकृती पूर्ण करताय. थांबवताय, संपवताय असं मी चुकूनही म्हणणार नाही. तुम्ही आज ही कलाकृती पूर्ण करताय आणि याच्यानंतर या कलाकृतीचे प्रयोग आम्हाला बघायला मिळणार नाही, हे फार धाडसाचे काम आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना एखादी कलाकृती पूर्ण करणं, तिला पूर्णविराम देणं हे धाडसाचं जास्त काम आहे. 


एरव्ही आपण शुभारंभाच्या प्रयोगाच्या शुभेच्छा देतो, तेही महत्त्वाचे आहे. एकवेळ शुभारंभाचा प्रयोग तुलनेने सोपा, पण उदंड प्रतिसादाच्या महासागरात एखादा प्रयोग पूर्ण करणं आणि तो पुन्हा न करणं हे जास्त अवघड आहे. या चिकाटीबद्दल या धाडसाबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार, तुमच्या टीमला सलाम. त्यातील काही लोकांना मी जवळून ओळखतो यात राजेश कांबळे, घाटे सर, पोंक्षे सर तर अर्थात आहेतच. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. ही कलाकृती आता जरी पूर्ण होत असली तरी वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा. या संपूर्ण टीमला माझा मनापासून नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी....", असे संकर्षण कऱ्हाडे या व्हिडीओत म्हणाला. 



संकर्षण कऱ्हाडेच्या या व्हिडीओवर शरद पोंक्षेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. "संकर्षण किती सुंदर प्रतिक्रीया दिलीस मित्रा धन्यवाद", असे शरद पोंक्षेंनी म्हटले आहे. शरद पोंक्षेच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एकाने ही कलाकृती संपू नये ही इच्छा आहे, असे म्हटले आहे. तर एकाने संकर्षण एकदम बरोबर बोललास असे म्हटले आहे.