प्रतीक्षा संपली! `संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई` चित्रपट `या` दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या `संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई` या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktai Release Date: भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई! बुद्धिमान, ज्ञानी अशा संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा भव्य मराठी चित्रपट 18 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी । -संत चोखामेळा आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया 18 एप्रिल 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. अशा कॅप्शनसह आलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये संत 'मुक्ताई' विठूरायाची आराधना करताना दिसते आहे.
देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी 'मुक्ताई'ने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून उलगडणार आहेत. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा वेगळा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.
संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.