नवी दिल्ली : हरियाणवी डान्सर सपना चौधरीने रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील जवाहर लाल नेहरु स्टेडियममध्ये सपनाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीदरम्यान मनोज तिवारी यांच्या प्रचारमोहिमेत सपना सहभागी झाली होती. तेव्हापासूनच ती भाजपामध्ये प्रवेश करण्याचे बोलले जात होते. परंतु त्यानंतर सपना भाजप प्रवेश करत नसून, केवळ दिल्ली उत्तर-पूर्वमधून मनोज तिवारी यांच्यासाठी प्रचारसभा करत असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी सपनानेही 'मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मनोज तिवारी माझे चांगले मित्र असल्याने मी त्यांच्या प्रचारसभेत सहभागी होत असल्याचं' तिने म्हटलं होतं. 



लोकसभा निवडणुकीदरम्यान, सपनाने प्रियंका गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केल्याने सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यावेळीदेखील सपनाने ती कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता, अखेर सपनाने भाजपमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


सपना चौधरी हरियाणातील सुप्रसिद्ध सिंगर आणि डान्सर आहे. सपनाने बॉलिवूडमध्येही आयटम सॉग्न्स केले आहेत. सपना चौधरीने रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये भाग घेतला. या शोमुळे ती अधिक प्रसिद्धीझोतात आली होती.