मुंबई : सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. 'केदारनाथ' या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. पण चित्रीकरण जसे जसे पुढच्या टप्प्यात जात आहे तसे साराचे  नखरेही वाढत जात असल्याचे म्हटले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा तिच्या लूकबाबत जरा जास्तच सजग आहे. त्यामुळे तिला हव्या असलेल्या लूकनुसारच ती कॅमेऱ्यासमोर येणे पसंत करते. शिवाय तयार होण्यासही ती बराच वेळ घेते. तिच्या या सवयीमुळे सेटवर अनेकांना ताटकळत राहावे लागते. इतकेच नाही तर ती आपल्या प्रत्येक लूकचे फोटो काढून ते फोटो एका व्यक्तीला पाठवते आणि त्या व्यक्तीकडून सल्ला घेऊन त्यानुसार ती पुन्हा आपला लूक बदलते. 


यावर दिग्दर्शक अभिषेकने स्पष्ट शब्दात तिची कानउघडणीही केली. सिनेमासाठी काय योग्य आहे, काय नाही याची दिग्दर्शकाला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे तो जे सांगेल तोच लूक अंतिम करण्यात येईल.


‘केदारनाथ’ सिनेमात सारा एक उच्चभ्रू घराण्यातल्या मुलीची भूमिका साकारत आहे तर सुशांत हा एका टुरिस्ट गाईडच्या भूमिकेत दिसणार आहे.  काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. पुढच्या वर्षी जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल.