मुंबई : मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळया-वेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात ही संगीताने करतात. कोणी प्रवासात तर कोणी काम करत असताना देखील संगीताचा आनंद घेत असतात. सारेगमपचे हे २५ वं वर्ष आहे. या यशस्वी रौप्यमहोत्सवी वर्षात झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे काही तरी आणखी खास घेऊन येत आहे. सारेगमप एक देश एक राग सोहळा झी मराठीवर रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. कारण त्यांचे आवडते गायक यामध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिजीत खोंडकेकर असणार आहे. तर सेलिब्रिटी गेस्ट असणार आहेत पल्लवी जोशी. 


या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांच्या सुरांची जादू अनुभवायला मिळणार आहे. तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत.


स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे. पल्लवी जोशी कमलेश भडकमकर आणि टीम सोबत सारेगमपच्या प्रवासाला उजाळा देतील.



या कॉन्सर्टमध्ये फक्त आवाजाचे सूरच नाही लागणार तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तुमचे आवडते विनोदवीर आणि काही कलाकार देखील असणार आहेत. हा मंच लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचा पुरेपूर मनोरंजन करणार आहे. हा विशेष सोहळा २४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर रंगणार आहे.