Danka Harinamacha First Poster : ‘युगे अठ्‌ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरपूरचा विठुराया..!!  दरवर्षी पहिल्या पावसासोबतच वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ दर्शन करण्यात आलं आहे. यंदाही टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर करत ‘डंका… हरीनामाचा’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.


19 जुलैला चित्रपटगृहात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डंका हरिनामाचा या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर एक विठुरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे. या मुर्तीवर लाल रंगाचा कपडा गुंडाळला असून ती झाकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ही मुर्ती अशी का आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. याचे गुपित येत्या 19 जुलैला उलगडणार आहे. 


चित्रपटात कलाकारांची मांदियाळी


रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव अशी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. 



हिंदी, तेलगू, तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार चित्रपट


या चित्रपटाची निर्मिती रविंद्र फड हे करत आहेत. ते स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र  स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे. ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपट मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगू , तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.