`परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची अन् राजेश खन्ना एकाच रात्रीत...,` ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांचा मोठा खुलासा, `माझ्या घरी रोज...`
ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी 80, 90 च्या दशकात व्हिलन म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी गद्दार, आप की कसम, हाथ की सफाई, आखरी इन्साफ, खून और पानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
बॉलिवूडमधील 80, 90 च्या दशकातील प्रसिद्ध खलनायकांची नावं घेतल्यास त्यात गोपाळ बेदी उर्फ रणजीत यांचं नावही प्रामुख्याने घेतलं जातं. स्क्रीनवरील रणजीत नावाने त्यांना जास्त प्रसिद्ध मिळाली. नुकतंच त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत जुन्या क्षणांना उजाळा दिला. आपण निर्व्यसनी असतानाही जुहूमधील बंगल्यात दररोज बॉलिवूड स्टार्ससाठी पार्टीचं आयोजन करत असायचो असं त्यांनी सांगितलं. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सुनील दत्त, राजकुमार, संजय खान, फिरोज खान, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेकजण हजेरी लावायचे असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी सांगितलं की, "माझे आई-वडील दिल्लीत आणि मी जुहूमध्ये राहायचो. संध्याकाळी तिथे सगळे एकत्र जमायचे. यावेळी तिथे कोणतेही प्रतिबंध किंवा औपचारिकता असा काही प्रकार नव्हता". रणजीत यांनी यावेळी अभिनेत्री कशाप्रकारे स्वयंपाक करायच्या हेदेखील सांगितलं. "रिना रॉय पराठा, मौसमी चॅटर्जी मासे, नितू कपूर भेंडी आणि परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची. तिथे अशा प्रकारचं वातावरण असायचं".
यावेळी त्यांनी खुलासा केला की, "राजेश खन्नासारखे लोक एका रात्रीत एक ते दोन बाटल्या संपवायचे". आपण अनेकदा एकापेक्षा जास्त शिफ्ट करुन घऱी परतलो तरी अनेकदा पार्टी त्याच उत्साहात सुरु असायची असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "मी फार धन्य आहे. मला वाटतं त्या घरात पाहुण्याचं स्वागत होत होतं, त्यामागे देवाचा आशीर्वाद होता. माझ्या बंगल्यात लोकांचं मनोरंजन करण्यासाठी पुरेशी जागा होता. तिथे तितकेच कर्मचारीही होते".
रणजीत यांनी यावेळी रात्रभर पार्टी सुरु असतानाही त्यातून आपण कामासाठी वेळ काढत अनेक शिफ्टमध्ये काम करायचो याबद्दलही सांगितलं. काही अनेक मोठे अभिनेते सकाळी 10 वाजताची शिफ्ट असतानाही दुपारी 2 वाजता उठायचे. ज्यामुळे मला एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करणं शक्य होत होतं. यामुळे अनेक संधीही निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
याच मुलाखतीत रणजीत यांनी फक्त व्हिलनसाठी काही विशिष्ट डायलॉग नसायचे, संपूर्ण लक्ष मुख्य अभिनेत्यावर असायचं असंही सांगितलं. "खलनायकाचे संवाद उत्स्फूर्त असायचे. त्या ओळी स्वतःहून आणल्या जायच्या. खलनायकांसाठी कोणतेही संवाद लिहिलेले नव्हते, ते फक्त नायक आणि नायिकांसाठी होते,” असं त्यांनी सांगितलं.
आजच्या चित्रपटांवर बोलताना ते म्हणाले की, "तर तुम्ही सध्याचे चित्रपट पाहिले तर त्यातून ओरिजनल सीन काढून आयटम नंबर आणि छेडछाडीचे सीन टाकल्याचं वाटतं. जुन्या काळात हेलन आणि बिंदू यांचा कॅब्रेट डान्स असायचा. त्या किती उत्तम प्रकारे करायच्या. गाईड चित्रपटातील वहिदा रहमान यांचा डान्स सिक्वेन्स किती सुंदर होता".
रणजीत यांनी गद्दार, आप की कसम, हाथ की सफाई, आखरी इन्साफ, खून और पानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.