`डान्स इंडिया डान्स`च्या `या` कोरियोग्राफरवर लैंगिक छळाचा आरोप; गुन्हा दाखल
कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई : बॉलिवूड कोरियोग्राफर आणि 'डान्स इंडिया डान्स' शोचा डान्सर सलमान सय्यद खानवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवारा येथे एका कॉफी हाऊसमध्ये सलमानने एका महिला कोरियोग्राफरवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस सलमानचा शोध घेत आहेत.
याआधीही बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांवर लैंगिक अत्याचार आणि #Metoo सारखे आरोप लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिलेने टी-सीरिज कंपनीचे मालक आणि चित्रपट दिग्दर्शक भूषण कुमारवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. महिलेने भूषण कुमार आणि त्याचे काका कृष्ण कुमार यांच्याविरोधातही ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु त्यानंतर महिलेने तक्रार मागे घेतली होती.