...म्हणून तन्मय भट्टचा `एआयबी`तून काढता पाय
का घेतला त्यांनी असा निर्णय?
मुंबई: 'ऑल इंडिया बकचोद' म्हणजेच 'एआयबी' म्हणून प्रकाशझोतात असणाऱ्या युट्यूब चॅनलच्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती सध्या अडचणीत आल्या आहेत. एआयबीचा सहसंस्थापक म्हणून ओळखला जाणारा तन्मय भट्ट आणि गुरसिमरन खंबा यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
तन्मय भट्टला एआयबीच्या ग्रुपमधून ताबडतोब बाहेर पडण्याची विचारणा करण्यात आली असून, गुरसिमरन खंबा याला कंपनीकडून पुढील नोटीस मिळेपर्यंत कंपनीत रुजू न होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
'गेल्या काही दिवसांपासून आम्ही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या आणि एआयबीच्या सहसंस्थापकांवर लावण्यात येणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर लक्ष ठेवून होतो. यामध्ये आम्ही तन्मयवर लावण्यात आलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करु शकत नाही', असं एआयबीच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या पत्रकात गुरसिमरन खंबारही लावण्यात आलेल्या आरोपांविषयी भाष्य करत त्याला अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाण्याची विचारणा कंपनीकडून करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
ही पोस्ट पाहता येत्या काळात तन्मय आणि गुरसिमरन हे एआयबीचे दोन महत्त्वाचे मोहरे त्यांच्या कोणत्याही नव्या व्हिडिओमध्ये दिसणार नसल्याचं कळत आहे.
दरम्यान, गुरसिमरनने झाल्या प्रकरणी आपली बाजू मांडल्याचंही पाहायला मिळालं असं असलं तरीही एआयबी कामाच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला दिवसेंदिवस आणखीनच गंभीर वळण मिळत असल्याचं दिसत आहे.