`या` चित्रपट निर्मात्यांना आवरा, म्हणे तेव्हा तनुश्रीची मासिक पाळी सुरु होती म्हणून...
नुसत्या स्पर्श करण्यानेही तिने इतका मोठा वाद निर्माण केला.
मुंबई: अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केला. जेव्हापासून संपूर्ण कलाविश्वात याविषयीच्याच चर्चांना प्रचंड उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या साऱ्या वादात बऱ्याच कलाकारांनी तनुश्रीची साथ दिली तर काहींनी मात्र नानांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं म्हणत त्यांची बाजू मांडल्याचं पाहायला मिळालं.
सध्याच्या घडीला हे सर्व प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं असून तनुश्रीने नाना पाटेकर, गणेश आचार्य, चित्रपट निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुख्य म्हणजे यादरम्यानच आता 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी यांनी तनुश्रीविषयी अतिशय लाजिरवाणं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे.
'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये सामी सिद्दीकी यांनी बऱ्याच सीमा ओलांडल्या असून ते वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर याविषयीचा व्हिडिओसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे . ज्यामध्ये चित्रीकरणावेळी नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न विचारला असता सिद्दीकी म्हणाले, ‘मी तुम्हाला खरं सांगणं अपेक्षित आहे? मला असं वाटतंय की त्यावेळी तनुश्रीची मासिक पाळी सुरु असावी. ज्यामुळेच तिची चिडचिड झाली असावी. म्हणूनच नुसत्या स्पर्श करण्यानेही तिने इतका मोठा वाद निर्माण केला. नेमकं काय घडलं हे मलासुद्धा माहित नाही कारण मी त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हतो.’
सिद्दीकी यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. किंबहुना अनेकांनी त्यावर व्यक्त होण्यास सुरुवातही केली आहे.
या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निर्माते सामी सिद्दीकी यांच्यासोबतच दिग्दर्शक राकेश सारंगनेही मुक्ताफळं उधळल्याचं पाहायला मिळत आहे.
‘हल्ली तर मुली इंटरनेटवर बेडरुम सेक्सचे व्हिडिओ अपलोड करतात. प्रसिद्धीसाठी विवस्त्र होतात. नाव कितीही खराब झालं तरीही प्रसिद्धीझोतात येणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. तनुश्री फक्त आरोपच करतेय', असं तो म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तनुश्री अतिशय लहान वाद विकोपास नेत असल्याचंही 'सिंटा'च्या काही सदस्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाने एक विचित्र वळण गाठलं आहे असंच म्हणावं लागेल.
मुख्य म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रात बऱ्याच गोष्टींच्या मर्यादा ओलांडल्या जात असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया आता नेटकऱ्यांनीही देण्यास सुरुवात केली आहे.