मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिची बहिण शमिता आणि आई सुनंदा यांच्यावर कर्ज बुडवल्याचा आरोप एका व्यावसायिकानं केलाय. शिल्पा शेट्टीच्या वडिलांनी आपल्याकडून व्यवसायासाठी २१ लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, अजून या कर्जफेड झालेली नाही असा आरोप व्यावसायिकानं केलाय. परंतु शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावलेत. शेट्टी कुटुंबीयांना २९ जानेवारी रोजी कोर्टासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑटोमोबाईल व्यावसायिक परहद आमरा यांनी ही तक्रार जुहू पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलीय. शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी यांनी २०१५ साली व्यवसायासाठी आमरा यांच्याकडून २१ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. २०१७ पर्यंत या कर्जाची परतफेड करण्याच्या वायद्यावर हे कर्ज देण्यात आलं होतं. तीन भागांमध्ये हे पैसे कंपनीच्या नावावर चेकद्वारे शेट्टी यांना देण्यात आले, असं आमरा यांचं म्हणणं आहे.


सुनंदा आणि त्यांच्या मुली यादेखील या व्यावसायात सुरेंद्र शेट्टी यांच्या भागीदार होत्या. त्यामुळे त्यांना या व्यवहाराबद्दल अगोदरपासून माहिती आहे. परंतु, २०१६ साली सुरेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना कर्ज घेतल्याचं नाकारल्याचं तक्रारदार आमरा यांनी म्हटलंय.


हे प्रकरण अंधेरी कोर्टात पोहचलंय. कोर्टाच्या आदेशानंतर जुहू पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत.