मुंबई : तेलुगु सुपरस्टार राणा दग्गुबाती आपल्या 'हाथी मेरे साथी' या सिनेमातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभू सोलोमन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून या सिनेमाची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. या सिनेमात आता राणासोबत अभिनेत्री श्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असल्याचं समोर आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे श्रियाने अभिनेत्री कल्कि कोचलीनला रिप्लेस केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाकरता राणा आणि कल्कीचं नाव समोर आलं होतं. पण आता कल्कीला श्रियाने रिप्लेस केलं आहे. श्रियाने या अगोदर बॉलिवूडमध्ये किंग खानसोबत 'फॅन' सिनेमात काम केलं आहे. तसेच मिर्झापूर या वेब सिरिजमध्ये देखील श्रियाने अतिशय चांगल काम केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हाथी मेरे साथी' हा सिनेमा तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तेलुगू आणि तमिळ या तीन भाषांत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तेलुगुमध्ये या सिनेमाचं नाव 'अरण्या' तर तमिळमध्ये 'कादन' असणार आहे. राणासोबतच या सिनेमात बॉलिवूड अभिनेता पुल्कित सम्राट देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच विष्णू विशाल, जोड हुसैन देखील या सिनेमात दिसणार आहे. कल्की रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या 'गली बॉय' या सिनेमात दिसणार आहे. यामुळे आता कल्की रणवीरसोबत दिसणार आहे. तसेच 'हाथी मेरे साथी' हा सिनेमा 1971 साली प्रदर्शित झालेल्या राजेश खन्ना यांच्या "हाथी मेरे साथी' ला श्रद्धांजली देणारा सिनेमा आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट जुन्या सिनेमापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या सिनेमातून माणसाला प्राण्यांबद्दल किती प्रेम आहे हे समोर येणार आहे. या सिनेमाकरता श्रिया आणि राणा केरळात काम करत आहे.


या अगोदर राणाने ट्विट करून आपण केरळच्या जंगलात सिनेमाचं शुटिंग करत असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून या सिनेमाचं चित्रिकरण सुरू असल्याचं समजतं. राजेश खन्ना यांच्या सिनेमाने लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत वेड लावलं होतं. आता राणा आणि श्रियाची जादू तशीच प्रेक्षकांवर चालणार का? याकडे साऱ्यांच लक्ष आहे.