सुबोध श्रुतीच्या शुभ लग्न सावधान सिनेमातील `ओ साथी रे` गाणं लाँच
शुभ लग्न सावधान
मुंबई : सनई-चौघडे,वरात घाई,नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमातील 'ओ साथी रे' हे भावनिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईट्सवर लाँच करण्यात आले आहे. उत्कृष्ट संगीत,गाण्याचे शब्द आणि त्याला मिळालेली सुबोध श्रुती यांच्या भुरळ घालणाऱ्या अभिनयाची साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडत आहे.
चित्रपटात काही कारणास्तव एकमेकांपासून दूर गेलेल्या सुबोध आणि श्रुती यांच्यावर भाष्य करणार हे इमोशनल गाणं सिनेमातील लग्नाच्या मस्तीभऱ्या माहौलपासून अगदीच वेगळं आहे. या गाण्यात सुबोध - श्रुतीच्या नात्यात आलेला दुरावा पाहायला मिळतो. प्रेमीयुगूलांना आकर्षित करणार हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडेचा आवाज लाभला असल्याकारणामुळे, हे गाणे सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे.
शुभ लग्न सावधान हा विवाहसंस्थेवर भाष्य करणारा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून, यात डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, सतीश सलागरे , प्राची नील, शिल्पा गांधी मोहिले, अभय कामत, ज्योती निवडुंगे, अमीत कोर्डे, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. दुबईत आणि इगतपुरीत चित्रिकरण झालेल्या या सिनेमासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सहनिर्मात्याची धुरा बजावली आहे.