मुंबई : काही गायकांचा आवाज थेट हृदयाला हात घालतो. डोळे बंद करुन ऐकल्यास हाच आवाज एका वेगळ्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो. गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांचा आवाज तसाच काहीसा. सूफी गायकीनं कैलाश खेर यांनी संगीतविश्वात वेगळेपण सिद्ध केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशशिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. किंबहुना ते आज हयात आहेत, त्यासाठीसुद्धा मित्रांचे आभार मानतात. एका मुलाखतीत खुद्द खेर यांनीच याबाबतचा खुलासा केला होता. 


कलाजगतामध्ये येण्यापूर्वी त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. जेव्हा एका व्यवसायाशी संबंधीत करारामध्ये त्यांनी मोठी रक्कम गमावली होती. त्या एका घटनेनंतर जणू आयुष्य थांबलंय, असंच वाटल्याचं ते मुलाखतीत म्हणाले. 


'मी वर्षभरासाठी नैराश्यात होतो. जेव्हा कोणताही मार्ग दिसेनासा झाला तेव्हा मात्र मी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. मी नदीत उडीही मारली होती. पण, मित्रांनी मला वाचवलं', असं ते म्हणाले. 


वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी एक भूखंड खरेदी केला होता. आई-वडील भाड्याच्या घरात राहतात हे जाणून घेत त्यांनी हा भूखंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, दरम्यानच्या काळात व्यवहार बिनसला आणि मेहनतीनं कमवलेल्या 22 लाख रुपयांची राखरांगोळी झाली. त्यांनी या आघातानंही न खचता, ज्योतिषविद्या शिकण्यासाठी म्हणून ऋषीकेश गाठलं. पण, इथंही निराशाच पदरी आली. 


नकारात्मक विचारांनी वेढलेलं असतानाच त्यांनी गंगेच्या पात्रात उडी मारली. त्यावेळी त्यांचा पाय घसरला या विचारानं मित्रानं त्यांचा जीव वाचवला. 2001 मध्ये त्यांनी कारकिर्दीत यश मिळवण्याच्या उद्देशानं मुंबई गाठली, इथे जाहिराती आणि रेडिओसाठी जिंगल गाण्यास सुरुवात केली. 


'वैसा भी होता है पार्ट 2' मधील  'अल्लाह के बंदे हंस दे' या गाण्यानं त्यांना विश्वासही बसणार नाही, इतकी प्रसिद्धी दिली आणि कैलाश खेर तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले. त्यांचं हे स्थान आजही अबाधित आहे.