मुंबई : आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ गायक मोहम्मद अजीज यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील नानावटी अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजीज यांच्या मुलीने म्हणजेच सना अजीजने याविषयीची माहिती दिली. 'दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आम्हाला याविषयीची माहिती मिळाली. ते कोलकात्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यासोबत नेहमीच कोणीतरही एक व्यक्तीही प्रवास करत असते. पण, गेल्या काही दिवसांपासून मात्र त्यांची प्रकृती खालावली होती. परतत असतानाच विमानतळावर त्यांचा तोल गेला होता', असं ती म्हणाली. 


अंत्यदर्शनासाठी अजीज यांचं पार्थिव कांदिवली पश्चिम येथे ठेवण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा त्यांच्या मुलीने दिली. 


जवळपास तीन दशकं, गायन क्षेत्रात अजीज यांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलं. हिंदी, बंगाली आणि ओडिया अशा विविधभाषी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं असून, अखेरच्या श्वासपर्यंत ते या कलेशीच जोडले गेले होते. 


मोहम्मद रफी यांच्या गायनशैलीचा प्रभाव असणाऱ्या अजीज यांनी 'ज्योती' या बंगाली चित्रपटातून या कलाविश्वात पदार्पण केलं होतं. 'अंबर' या चित्रपटापासून ते हिंदी कलाविश्वातही ओळखले जाऊ लागले होते. ज्यानंतर संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी 'मर्द' चित्रपटाच्या निमित्ताने अजीज यांना बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी दोन गाणी गाण्याची संधी दिली. 


१९८० आणि ९० च्या दशकात अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती आणि आशा भोसले यांच्यासोबत गायलेली अजीज यांची गाणीही विशेष गाजली होती. आजही 'माय नेम इज लखन', 'लाल दुपट्टा मलमल का', 'मै तेरी मोहोब्बत मे' आणि 'दिल ले गयी तेरी बिंदीया' ही त्यांची गाणी प्रेक्षकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत.