मुंबई : गायक नीति मोहन आणि अभिनेता निहार पांड्या १५ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. हैदराबादमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर लगेचच नीति आणि निहार यांच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. परंतु लग्नसोहळ्यादरम्यानच नीति मोहनचे वडिल बृज मोहन शर्मा यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचं लग्न लागतानाही ते आयसीयूमध्ये दाखल होते. बृज मोहन शर्मा यांची तब्येत ठीक नसल्याने लग्नानंतर ठेवण्यात आलेलं रिसेप्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. 






COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या दोघांच्या लग्नानंतर त्यांचे लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. नीति आणि निहारने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले असून या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या मेहेंदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटोही व्हायरल झाले होते.




गेल्या चार वर्षापासून नीति आणि निहार रिलेशनशिपमध्ये होते. निहार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका' चित्रपटात झळकला होता. नीति आणि निहार कपिल शर्माच्या शोमध्ये एकत्र आले होते. त्यावेळी निहारने दोघांच्या लव्हस्टोरीबाबत खुलासा केला होता. निहारने 'आसमां नावाच्या एका ब्रॅन्डशी नीति आणि मी दोघेही जोडलेलो होतो. मी माझ्या एका मित्राला नीतिशी भेटण्याबाबत विचारले होते. पण आमची भेट होत नव्हती. त्यानंतर अनेक दिवसांनंतर त्याच मित्राच्या लग्नात नीति आणि माझी भेट झाली. मला पहिल्याच नजरेत ती आवडली होती. त्यानंतर आमची लव्हस्टोरी सुरू झाली' असल्याचं त्यानं सांगितलं.