मुंबई  : तरुणाईच्या मनावर राज्य करणारी गायिका नेहा कक्कड सध्या सोशल मीडियावरही बरीच ट्रेंडमध्ये आहे. अनोखी गायनशैली आणि तिचा कलाविश्वातील वावर पाहता अवघ्या काही वर्षांमध्येच ती प्रसिद्धीझोतात आली ज्याचा अनेकांनाच हेवा वाटतो. आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या गायिकेचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी गाण्याच्या व्हिडिओमुळे नेहा चर्चेत आहे, असं वाटत असल्याचा समज चुकीचा ठरु शकतो. कारण, नेहा या घडीला चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या अफलातून नृत्य कौशल्यामुळे. 'सिंबा' या आगामी चित्रपटातील स्वत:ल गायलेल्या 'आँख मारे' या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनवर ती ठेका धरताना दिसत आहे. यामध्ये तिला साथ मिळाली आहे ती म्हणजे नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईस याची. 


नेहाच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याच तोडीस असणारा तिचा दिलखुलास अंदाज या साऱ्याची तिच्या नृत्यकौशल्याला जोड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने तिचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंग आणि सारा अली खान या जोडीवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. 


रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा' या चित्रपटातील हे गाणं एकिकडे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतानाच आता त्याला टक्कर देतोय तो म्हणजे नेहा कक्कडचा हा डान्स व्हिडिओ. तेव्हा आता लाइक्स, शेअर्स आणि व्ह्यूजच्या स्पर्धेत या दोन्ही व्हिडिओंपैकी कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 


मुख्य म्हणजे नेहाचं नृत्यकौशल्य सर्वांसमोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा तिने आपल्या नृत्यकौशल्याची झलक सर्वांना दाखवून दिली आहे. गायिका, रिअॅलिटी शोची परीक्षक, एक चांगली नर्तिका अशा विविध रुपांमध्ये दिसणारी नेहा खऱ्या अर्थाने बहुगुणी आहे असं म्हणायला हरकत नाही.