मुंबई : 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटावर आधारित कथानकाचीच पुनरावृत्ती 'कबीर सिंग' या चित्रपटातून करण्यात आली. अभिनेता शाहिद कपूर याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या कबीर सिंग चित्रपटाला समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरीही काहींनी मात्र थेट शब्दांमध्ये चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. गायिका सोना मोहापात्रा हिचाही यात समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात 'कबीर सिंग' हे पात्रच पसंतीस न उतरल्याची प्रतिक्रिया सोनाने दिली. परखड मतं मांडल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सोनाचा समावेश होतो. त्यामुळे तिची ही भूमिका अनेकांसाठी तशी सवयीचीच. 


शाहिदच्या चित्रपटाविषयी सांगावं तर, त्याने साकारलेला 'कबीर सिंग' आपल्याला खटकल्याचं स्पष्ट करत सोनाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यपदी असणाऱ्या रेखा शर्मा यांनाही या कारणाने निशाण्यावर घेतलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर शर्मा यांनी शाहिदची प्रशंसा केली होती, त्यावरच सोनाने निशाणा साधला. शिवाय अभिनेता नकुल मेहता याच्या ट्विटवरही तिने थेट शब्दांत उत्तर दिलं आहे. 



'चित्रपटात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं आणि एका विचित्र वृत्तीचंही चित्रण करण्यात आलं आहे, त्यावर तुमचं लक्ष गेलं नाही का? फक्त गंभीर अभिनयच तुम्हाला दिसला? हे सारं अतिशय मनस्ताप देणारं आहे. तुम्ही स्वत: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहात. हे पाहता तर महिलांविषयी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर काय अपेक्षा केली जावी याचं मला आश्चर्यच वाटत आहे', अशा थेट शब्दांत तिने ट्विट केलं. 



सोनाचं हे ट्विट आणि चित्रपटाविषयीची तिची एकंदर भूमिका पाहता शाहिद यावर काही प्रतिक्रिया देतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शाहिदची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकिकडे कमाईचे आकडे उंचावत असतानाच दुसरीकडे मात्र या 'कबीर सिंग'चं उध्वस्त करणारं प्रेम मात्र अनेकांना रुचलेलं नाही हेसुद्धा तितकंच खरं.