मुंबई : अभिनेता नवाझुजद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या काही तासांपूर्वीच सेन्सॉरकडून त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, ट्रेलर प्रदर्शित करणारच, असा निर्धार व्यक्त करत शिवसेना नेते आणि चित्रपट निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर प्रदर्शित केलाच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य नवाझने पेललं, त्यांच्या चालण्यापासून व्यासपीठावरील जळजळीत भाषणांपर्यंतची प्रत्येक बाब त्याने खऱ्या अर्थाने टीपली. या ट्रेलरची अनेक स्तरांतून प्रशंसाही झाली. पण, दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याने मात्र ट्रेलरमधील संवादाविषयी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीड्याच्या माध्यमातून सिद्धार्थने 'ठाकरे'च्या निमित्ताने कृपया द्वेष पसरवणं थांबवा, असं म्हटलं आहे. 




'नवाझने या चित्रपटाच्या निमित्ताने उठाओ लुंगी बजाओ पुंगी या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. दाक्षिणात्यांविषयीचं हे विधान मला अजिबातच पटलेलं नाही', असं म्हणत या अशा मार्गाने तुम्ही पैसे कमवणार आहात का, असा सवाल त्याने उपस्थित केला. सोबतच द्वेष पसरवणं थांबवा, असं म्हणत हे सारं भीतीदायक असल्याचंही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं. 



सिद्धार्थने चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतल्यानंतर आता पुढे त्याला काय उत्तर मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पण, 'ठाकरे' या चित्रपटाच्या निमित्ताने फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवासच नव्हे तर, अनेक विषयांनाही वाचा फोडली जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही.