#MeToo प्रकरणात प्रकाश राज यांची उडी, म्हणाले...
निदान आतातरी....
मुंबई : #MeToo ची हवा सध्या कलाविश्वात ज्या वेगाने पसरत आहे ते पाहता आता अनेकजणांना धडकी भरली आहे, असं म्हणायला हरकत नाही. विविध भाषीय कलाविश्वात सध्याच्या घडीला काही मोठ्या प्रस्थांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आल्यामुळे एकच खळबल माजली आहे. या सर्व प्रकरणात आता 'जयकांत शिक्रे' म्हणून लोकप्रिय असणाऱ्या अभिनेता प्रकाश राज यांनीही उडी घेतली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सारजावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री श्रुती हरिहरन हिला प्रकाश राज यांनी पाठिंबा दिला आहे.
श्रुती जे काही सांगत आहे ते खरं असल्याचं म्हणत अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथ हिनेही तिला पाठिंबा दिला आहे.
आपल्याला त्या प्रसंगाविषयी माहिती होती. एका कार्यक्रमादरम्यान खुद्द श्रुतीनेच त्याविषयीची वाच्यता केली होती, असं म्हणत श्रद्धाने आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलं.
श्रद्धाने तिच्यासोबत घडलेल्या अशाच प्रसंगाचं वर्णन करत काही कटू आठवणी जागवल्या.
#MeToo च्या या वादळात अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरची मदत घेत अभिनेता अर्जुनचा उल्लेख 'प्राईड ऑफ कन्नडा' सिनेमा असा करत श्रुतीला पाठिंबा दिला.
महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या हतबलता, घुसमट आणि अत्याचार या सर्व गोष्टी #MeToo मुळे संपुष्टात येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कळत नकळत महिलांना समजून घेण्यात आपण पुरुष चुकलो असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश राज यांनी मांडलेले विचार पाहता #MeToo च्या या वादळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.