...तर सुशांतचा जीव वाचला असता; महत्त्वाच्या साक्षीदाराचा गौप्यस्फोट
अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवसाला नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शन असो किंवा मग रियासोबचं त्याचं नातं असो. प्रत्येक बाबतीत अगदी कसून चौकशीही केली जात आहे. त्यातच आता आणखी एका माहितीचा दुवा हाती लागला आहे.
मुंबई : अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवसाला नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शन असो किंवा मग रियासोबचं त्याचं नातं असो. प्रत्येक बाबतीत अगदी कसून चौकशीही केली जात आहे. त्यातच आता आणखी एका माहितीचा दुवा हाती लागला आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या खोलीमध्ये जे पाचजण होते, त्यांच्यापैकी अत्यंत महत्त्वाच्या साक्षीदारानं 'झी न्यूज हिंदी'शी संवाद साधताना काही गौप्यस्फोट केले. सुशांतनं ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली त्याची दारं अनेक प्रयत्न करुनही खोलता आली नव्हती. अखेर, त्याच्याच घरात राहणाऱ्या एका मित्रानं रफीक नामक चावीवाल्याला बोलवून दार खोलून घेतलं. हाच चावीवाला सध्या या प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक महत्त्वाचा साक्षीदार ठरत आहे.
सीबीआयनं केली चौकशी...
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं या चावीवाल्याचीही चौकशी केली. ज्यानंतर माध्यमांनीही त्याला घेराव घातला. सीबीआयचा एकंदर सुरु असणारा तपास पाहता लवकरच या प्रकरणाची उकल होईल, अशी आशाही त्यांनं व्यक्त केली.
दार खोलून देण्यासाठी मिळाले २००० रुपये...
१४ जून या दिवसानंतर आपलं आयुष्य बदलून गेलं आहे. अनेकांच्या प्रश्नांची उत्तर देऊन आपण थकल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली. सुशांतच्या घरी गेल्याचा दिवस आपण कधीच विसरु शकत नाही, असं सांगत रफीकनं या कामासाठी आपल्याला २००० रुपये मिळाल्याचं सांगितलं. पैसे मिळाले खरे, पण सुशांतचा मृतदेह पाहून त्याला जबर धक्का बसला. चावीवाल्या त्या व्यक्तीनं इतका धसका घेतला की, पुढील पंधरा दिवसांसाठी त्यानं दुकान आणि काम पूर्णपणे बंद ठेवलं.
...तर वाचू शकला असता सुशांत
माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या मित्रानं काही वेळ आधीच आपल्याला बोलावत दार उघडून घेतलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचवताही आला असता, असा खळबळजनक दावा त्यानं केला. आपण पोहोचेपर्यंत सुशांतचे प्राण गेले होते याची खंत त्यानं व्यक्त केली. सुशांतनं आत्महत्या केल्याचं कळताच त्या वेळी त्या खोलीमध्ये जे कोणी उपस्थित होते, त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती, अशी माहितीसुद्धा या चावीवाल्या व्यक्तीनं दिली आहे. तेव्हा आता या माहितीच्या बळावर सदर प्रकरणाला काही वळण मिळतं की गोष्टी आहे त्याच वेगानं पुढे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.