पुणे : 'नटरंग', 'रंग दे बसंती', 'हे राम' यांसारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी छटा निर्माण करणारा अभिनेता अतुल कुलकर्णी हा कायमच लक्षवेधी ठरला आहे. कलाकृतीप्रमाणेच अभिनेता अतुल कुलकर्णी सामाजिक भानही राखतो. अतुल कुलकर्णीने एका कार्यक्रमात लोकसंख्यावाढ आणि पर्यावरणाबाबत वक्तव्य केलं आहे. 'पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी नियम बदलले गेले पाहिजेत. मूल जन्माला आलं की वस्तूंचा वापर सुरु होतो. देशाची वाढलेली लोकसंख्या आपण रोखू शकत नाही. पण लग्नानंतर मूल झालंच पाहिजे असा अट्टाहास सोडायला हवा. लग्नानंतर मूल जन्माला घालणं बंद करायला हवं' असं मत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतुल कुलकर्णी यांनी, 'माझ्या लग्नाला २२-२३ वर्ष झाली आहेत. पण मी मूल जन्माला येऊ दिलं नसल्याचं हे एक कारण आहे' असंही ते म्हणाले.


जिवंत असलेल्या पिढीने येणाऱ्या पिढीला खाईत लोटलं असल्याचंही ते म्हणाले. मागे वळून पाहताना आपलं काय चुकलं हे लक्षात आल्यानंतरही आपण वेगळा विचार करणार आहे का? यशाच्या व्याख्या येणाऱ्या पिढीवर जशाच्या तशा आपण लादणार आहे का? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. 



'आता आपलं चुकलं हे मान्य करण्याची वेळ आली आहे. गाडी, बंगला महत्त्वाचा वाटत आहे. आजकाल खूप स्पर्धा असून स्पर्धेला महत्त्व असल्याची पालकांमध्ये चर्चा आहे. मुलांनाही हेच शिकवलं जातंय. आपण खूप बिझी झालो असून बिझी असणं यशस्वीपणाचं लक्षण मानलं जात असल्याचं' ते म्हणाले.


असं सामाजिक भान राखणारा अभिनेता पर्यावरणाबाबतही जागरुक आहे. अतुल कुलकर्णी यांचं घरही अतिशय पर्यावरणपूरक आहे. वाडा येथे अतुल कुलकर्णी आणि त्यांची पत्नी गीतांजली  यांचं घरं आहे. या घराला त्यांनी तानसा असं नाव दिलंय. त्यांच्या घरात पंखा, टीव्ही नाही. प्राणीप्रेमी असलेल्या अतुल कुलकर्णी यांच्या घरात मांजरींचाही वावर दिसतो.