Alibaba aani Chalishitale Chor Teaser : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट यांसह सर्वच माध्यमात त्याने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता लवकरच सुबोध भावे एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' हा चित्रपट 'चाळीशी' भोवती फिरणारा आहे. पण यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरच्या सुरुवातीला चाळीशीतील काही मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यादरम्यान अचानक लाईट जाते आणि त्याचवेळी अचानक एक आवाज येतो. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता यामागे काहीतरी धमाल गुपित दडल्याचे दिसत आहे. 


''हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे. परंतु चाळीशीनंतरच जगण्याची खरी मजा सुरु होते. हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही. त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते. चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. विशेषतः चाळीशीतील प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल.'' असे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले.



सध्यातरी 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' यातील चाळीशीतील या चोरांबद्दलचे गूढ अधिकच वाढत आहे. पण हे गूढ जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 29 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.