वडिलांनी वेटर म्हणून काम केलेल्या तिन्ही इमारतींचा सुनील शेट्टी आज मालक, म्हणतो, `बाबा तांदळाच्या पोत्यावर...`
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) आपल्या वडिलांनी कशाप्रकारे आर्थिक स्थितीवर मात करत श्रीमंत झाले याचा प्रवास सांगितला आहे. तसंच एकेकाळी वेटरचं काम करणारे ते नंतर अनेक इमारतींचे मालक झाले.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. आज सुनील शेट्टी जर इतका यशस्वी आणि श्रीमंत असेल तर यामागे त्याच्या वडिलांची अपार मेहनत आहे. नुकतंच सुनील शेट्टीने आपल्या वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी घऱातून पळ काढत मुंबई गाठली तेव्हा किती संकटाचा सामना करत यश मिळवलं याचा उलगडा केला आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी मंगळुरुमील घर सोडलं होतं. यानंतर ते मुंबईत पोहोचले. सुरुवातील ते वेटरचं काम करत टेबल पुसत होते. नंतर ते रेस्टराँ मॅनेजर आणि अखेर मालक झाले. आपले वडील ज्या इमारतींमध्ये काम करत होते त्या तिन्ही इमारती आपण विकत घेतल्याचं सुनील शेट्टीने सांगितलं आहे.
कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर सुनील शेट्टीने वडिलांचा संघर्ष सांगितला. "माझे वडील बालपणी घरातून पळून मुंबईत आले होते. त्यांना वडील नव्हते, पण तीन बहिणी होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना एका साऊथ इंडियन रेस्तराँमध्ये काम मिळालं. आमच्या समाजात आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो. त्यांना सर्वात आधी टेबल पुसण्याचं काम मिळालं होतं. ते फार लहान होते. यामुळे टेबल पुसताना त्यांना चारही बाजूला फिरायला लागायचं. ते तांदळाच्या पोत्यावर झोपायचे," असं सुनील शेट्टीने सांगितलं.
आपल्या वडिलांनी अतुलनीय दृढता दाखवली असं सुनील शेट्टी सांगतो. “त्यांच्या बॉसने तीन इमारती विकत घेतल्या आणि वडिलांना त्या सांभाळण्यास सांगितलं. बॉस निवृत्त झाल्यावर वडिलांनी तिन्ही इमारती विकत घेतल्या. आजही माझ्याकडे तिन्ही इमारती आहेत. आणि तिथूनच आमचा प्रवास सुरू झाला,” असं सुनील शेट्टीने सांगितलं.
सुनील शेट्टीने 1992 मध्ये अभिनयात पदार्पण केले. अनेक वर्षं कॅटरिंग व्यवसायात काम केलेलं असतानाही वडिलांनी मला झेप घेण्यासाठी आग्रह केला असं सुनील शेट्टीने सांगितलं. “माझे वडील खूप नम्र होते. पण जर कोणी त्यांच्या मुलांबद्दल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही बोलले तर ते जणू सिंहाचं रुप धारण करायचे. के नेहमी म्हणायचे: ‘बेच डालूंगा सब कुछ, गांव चले जाऊंगा, पर नाइंसाफी नहीं झेलुंगा (मी सर्व काही विकून माझ्या गावी परत जाईन, पण अन्याय सहन करणार नाही)," अशी आठवण सुनील शेट्टीने सांगितली. सुनीलच्या वडिलांचे 2017 मध्ये निधन झालं