श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा देत सुनीता कपूर भावूक
श्रीदेवींच्या आठवणी फक्त फोटो, चित्रपटांच्या माध्यमातून सर्वांमध्ये राहिल्या.
मुंबई : बॉलिवूडची चाँदनी म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांनी २०१८ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांच्या आठवणी फक्त फोटो, चित्रपटांच्या माध्यमातून सर्वांमध्ये राहिल्या. त्याच्या अचानक निघून जाण्याने चाहत्यांसह कलाविश्वाला मोठा धक्काच बसला. पण, तरीही यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब मोठ्या धीराने पुन्हा उभं राहिलं.
सर्वांच्याच लाडक्या 'श्री'चा एकाएकी विषय निघण्याचं कारण ठरत आहे एक फोटो. अभिवेत्री सोनम कपूरची आई म्हणजेच अनिल कपूर यांची पत्नी सुनिता कपूर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'उरल्या त्या आठवणी' असे कॅप्शन लिहिले आहे.
मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हाचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फॅमिली फोटोमध्ये बोनी कपूर, श्रीदेवी, सुनीता कपूर, अनिल कपूर, संजय कपूर आणि महीप कपूर एकत्र दिसत आहेत. या फोटोमध्ये श्रीदेवी अत्यंत आकर्षक दिसत आहेत. गतकाळातील हाच क्षण आठवत सुनिता कपूर भावूक झाल्या आहेत.
श्रीदेवींच्या 'मॉम' चित्रपटातील भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले होते. मृत्यूनंतर अभिनेता शाहरूख खान स्टारर 'झिरो' चित्रपट त्यांची एक झलक प्रेक्षकांना अनुभवता आली. आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 'हवा हवाई' अखेर २०१८ साली काळाच्या पडद्या आड गेली. आणि राहिल्या त्या तिच्या आठवणी...