मुंबई : कर्नाटक शिक्षक भरती परीक्षेत एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. परीक्षेसाठी गेलेल्या एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा बोल्ड फोटो छापण्यात आला होता. आता या कथित प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष बीआर नायडू यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर कथित प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने हॉल तिकिटवर उमेदवाराच्या फोटोऐवजी सनी लिओनचा एडल्ट फोटो छापल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू यांनी ट्विट करत लिहीलं आहे की, "शिक्षक भरतीच्या हॉल तिकिटात उमेदवाराच्या फोटोऐवजी शिक्षण विभागाने एडल्ट फिल्म अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापला होता. विधानसभेच्या आत एडल्ट फिल्म पाहणाऱ्या पार्टीकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो."


नायडू यांच्या आरोपाला उत्तर देत कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केलं आहे. निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, "उमेदवाराला एक फोटो अपलोड करावा लागतो. त्यानंतर सिस्टम त्यांनी अपलोड केलेला फोटो घेतं. जेव्हा आम्ही उमेदवाराला विचारले की त्याने सनी लिओनीचा फोटो त्याच्या प्रवेशपत्रावर टाकला आहे का, तेव्हा तिने सांगितलं की, तिच्या पतीच्या मित्राने माहिती अपलोड केली आहे."


या घटनेची माहिती असलेल्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, उमेदवाराने आपला अर्ज, कागदपत्रं आणि फोटो अपलोड करण्यासाठी इतर कोणाची तरी मदत घेतली होती. शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवाराचा फॉर्म तिच्या पतीच्या मित्राने भरला होता. उमेदवार चिकमंगळूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शिवमोग्गा येथील शिक्षक पदासाठी त्यांनी अर्ज केला होता.



परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कर्नाटकातील 781 केंद्रांवर झालेल्या परीक्षेला एकूण 3,32,913 उमेदवारांनी हजेरी लावली होती. सार्वजनिक सूचना विभागाने या घटनेवर स्पष्टीकरण जारी करून म्हटलं आहे की, ''चूक ना सरकारची होती ना शिक्षण विभागाची''. मात्र, कर्नाटक शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एफआयआर नोंदवणार असल्याचं सांगितलं.