`सर्फ एक्सेल`च्या जाहिरातीवर धर्माच्या राजकारणाचा रंग, #BoycottSurfExcel ट्रेंडमध्ये
विरोध नेमका कशासाठी?
मुंबई : सण- उत्सवांचे दिवस जवळ आले की अमुक एका उत्पानाची जाहिरातबाजीही त्याच अनुषंगाने सुरू होते. सोशल मीडिया आणि जाहिरात विश्वात सध्या अशीच एक जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. किंबहुना ती जाहिरात मागे घेण्याची मागणीही अनेकांनीच केली आहे. 'सर्फ एक्सेल' या डिटर्जंट कंपनीची ही जाहिरात असून, खास होळीच्या निमित्ताने ती साकारण्यात आली आहे. 'दाग अच्छे है' अशा टॅगलाईनसह सर्फच्या बऱ्याच जाहिराती आजवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण, ही नवी जाहिरात मात्र काहींचा रोष ओढावणारी ठरत आहे.
#RangLaayeSang अशा हॅशटॅगसह पोस्ट करण्यात आलेल्या या जाहिरातीत सणाची पार्श्वभूमी घेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा आणि तितकाच भावनात्मक पैलू मांडण्यात आला आहे. या जाहिरातीच्या शेवटी 'दाग अच्छे है....', अशी 'सर्फ'ची टॅगलाईनही ऐकू येते. 'अगर कुछ करने मे दाग लग जाए, तो दाग अच्छे है', अशी ही टॅगलाईन जाहिरातीच्या शेवटी एक संदेश देऊन जाते. रंगांच्या या सणाच्या निमित्ताने सर्वधर्मियांना एकत्र येण्याचा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला आहे.
युट्यूबवरही लक्षावधी व्ह्यूज मिळवणाऱ्या या जाहिरातीवर मात्र अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. वादग्रस्त आणि हिंदू धर्माविरोधी असल्याचं म्हणत काही नेटकऱ्यांनी जाहिरातीला विरोध केला आहे. तर, #BoycottSurfExcel असं म्हणत अनेकांनीच ही जाहिराच मागे घ्यावी अशी मागणी हिंदुस्तान युनिलिव्हरकडे केली आहे. जाहिरातीच्या मुद्द्यारवरुन धर्माच्या राजकारणाचाच रंग सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी तर या जाहिरातीतून 'लव जिहाद'चं समर्थन करण्यात येत असल्याचाच मुद्दा मांडत प्रकरणाला वेगळं वणळ देण्याचा प्रयत्न केला. 'सर्फ एक्सेल'च्या या जाहिरातील्या बाजुनेही काहींनी मतंप्रदर्शन केलं. ज्यामध्ये काही प्रसिद्ध चेहऱ्यांचाही समावेस होता. पण, एकंदर वातावरण पाहता, होळीच्या निमित्ताने साकारण्यात आलेली ही जाहिरात धर्माच्या राजकारणाच्या रंगात रंगली हेच चित्र दिसत आहे.